जगात आणि भारतात कोरोनाच्या महामारी ने हाहाकार माजविला आहे. सरकारी आणि खाजगी इस्पितळे रोग्यांनी भरलेली आहेत. सरकारी निर्बंध व रोगाची भीती यामुळे सर्व दैनंदिन व्यवहार बंद पडलेले आहेत. इस्पितळातील रोगी आणि नातेवाईक यांना आवश्यक असलेले अन्न पाणी मिळणे कठीण झाले. परंतु या संकट काळात रेवोल्युशनरी गोवन्स संघटनेचे क्रांतिकारी युवक पिडीत लोकांच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांच्या या संकल्पात जीवाला धोका असून सुद्धा आपली व आपल्या कुटुंबाची पर्वा न करता दिवस-रात्र गरजूंना मदत करीत आहेत. ऊन- पाऊस वारा याची तमा न बाळगता सरकारी इस्पितळा बाहेर उभे राहून लोकांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करीत आहेत.


जवळजवळ ४१ दिवस हे कार्य अखंडपणे चालू आहे. बांबोळी येथे आज पर्यंत १३ हजार जेवणे , २४ ते २५ हजार अल्पोपहार व हजारो पाण्याच्या बाटल्या वितरित केल्या आहेत. तसेच दक्षिण गोवा हॉस्पिटल येथे हजारो जेवणाची पाकिटे व अल्पोपहार वितरित केले आहेत. त्याच प्रमाणे कुठ्ठाळी येथील हॉस्पिटल, फोंडा येथील हॉस्पिटल, काणकोण आणि खांडोळा येथे पण हे वितरण झाले आहे.
यासाठी संघटनेचे चाहते व गोवा प्रेमी उत्स्फूर्तपणे मदत करीत आहेत. आपले वाढदिवस साजरे न करता तो पैसा गरजू लोकांना पाणी पुरवण्यासाठी दान करीत आहेत. गोवेकरांच्या हक्कांसाठी झगडणारी संघटना या संकटकाळात गोयकर आणि भायले असा भेदभाव न करता माणुसकीच्या भावनेतून हे कार्य करीत आहेत. ही संघटना आणि त्यांचे निस्वार्थी कार्यकर्ते कौतुकास पात्र आहेत.
गोवेकरांसाठी आम्ही असेच निस्वार्थी पणाने काम करणार असे वीरेश बोरकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here